बेळगाव लाईव्ह : अबकारी विभागाच्या विशेष मोहिमेंतर्गत मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थ अधिकृतरीत्या नष्ट करण्यात आले. बेळगाव विभागातील विविध जिल्ह्यांत जप्त केलेले गांजा, अफू, चरस आणि अन्य पदार्थांचे नियमानुसार उच्चस्तरीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.
अबकारी विभागाने मोठ्या प्रमाणात जप्त केलेले अंमली पदार्थ नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली. बेळगाव विभागाचे जॉइंट कमिशनर एफ. एच. चलवादी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ड्रग डिस्पोजल कमिटीच्या सदस्यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली. या मोहिमेत विजयपूर, चिक्कोडी आणि बागलकोट जिल्ह्यांतील जप्तीचा समावेश होता.
यामध्ये चिक्कोडी जिल्ह्यातून 421.168 किलो गांजा आणि 1.915 किलो चरस जप्त करण्यात आला होता. बागलकोट विभागातून 78 किलो गांजा, तर विजयपूर जिल्ह्यातून 90.44 किलो अफू, 106.732 किलो गांजा आणि 4 किलो अफू बिया जप्त करण्यात आल्या होत्या.
हे सर्व अंमली पदार्थ बेळगाव तालुक्यातील नावगे गावातील एस. व्ही. पी. केमिकल्स युनिटमध्ये नष्ट करण्यात आले. ही कारवाई पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडली असून, त्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या कारवाईत विजयपूरचे उपआयुक्त मुरलीधर, चिक्कोडीचे उपआयुक्त स्वप्न आणि बागलकोटचे उपआयुक्त हणमंतप्प भजंत्री यांनी सहभाग घेतला.
अबकारी विभागाने अंमली पदार्थ तस्करीविरोधात कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. समाजातील युवकांना या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अशा मोहिमा सातत्याने राबवल्या जातील, असे विभागाने स्पष्ट केले आहे.