बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात कांही भागात 500 आणि 100 रुपयांच्या बनावट चलनी नोटांचा सुळसुळाट झाला असून त्यामुळे वादाचे प्रसंग घडण्याबरोबरच सर्वसामान्यांना फटका बसत असल्यामुळे पोलीस प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
शहराच्या कांही भागातील बाजारामध्ये बेकायदेशीररित्या छपाई केलेल्या 500 आणि 100 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्याचे दिसून येत आहे. या नोटांमुळे अनेक नागरिकांची फसवणूक होत असल्यामुळे ते हवालदिल झाले आहेत.
कांही ठिकाणी वादाचे प्रसंग देखील घडत आहेत सर्वसामान्य नागरिकांना घाईगडबडीच्या वेळेत खऱ्या आणि खोट्या नोटा यातील फरक कळणे सकृतरित्या शक्य नसतं. त्यामुळे बनावट नोटा देणाऱ्यांचे फावत असले तरी अल्प उत्पन्नधारक एखाद्या गरिबांच्या हाती अशी मोठ्या रकमेची नोट लागली तर त्याची हवालदीलता वाढते.
याची दखल घेऊन जिल्हा व पोलीस प्रशासनाने सदर प्रकाराकडे तात्काळ गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
सध्याच्या सणासुदीचा काळात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल होत आहे. या संधीचा गैरफायदा उठवण्यासाठी शहराच्या कांही विशिष्ट भागात मोठ्या प्रमाणात या बनावट नोटा चलनात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.