उन्हामुळे मातीच्या भांड्यांना वाढती मागणी; कुंभारांचा मात्र उपजीविकेसाठी संघर्ष

0
5
Pot
 belgaum

बेळगाव लाईव्ह :सध्या उन्हाळा तीव्र होत असल्यामुळे बेळगावमधील कुंभार व मातीची भांडी विक्रेते यांचा व्यवसाय तेजीत असून ज्यामुळे त्यांना अत्यंत आवश्यक असलेला दिलासा मिळत आहे. वाढत्या तापमानासह, पाणी नैसर्गिकरित्या थंड ठेवण्यासाठी अधिकाधिक लोक पारंपारिक मातीच्या भांड्यांकडे वळत असल्यामुळे अलिकडेच बेळगावमधील संपूर्ण प्रदेशातील कुंभारांची विक्री वाढली आहे.

रेफ्रिजरेटरच्या आधीपासून पिण्याच्या थंडगार पाण्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर ही एक जुनी परंपरा आहे. आजही बरेच लोक रेफ्रिजरेटर किंवा शुद्धतेचा इतर पर्यायांपेक्षा मातीच्या भांड्याती पाण्याचे ताजेतवानेपण आणि आरोग्यदायी फायदे पसंत करतात. या पद्धतीने मातीच्या भांड्यांना वाढती मागणी असली तरी त्यांच्या उत्कृष्ट घडवणुकीसाठी ओळखले जाणारे खानापूरचे कुशल कुंभार मात्र आर्थिकदृष्ट्या संघर्ष करत आहेत.

मॉडर्न पॉटरी केराकोटा आर्ट या कलेचा वापर करून कुंभार व्यवसाय करणारे खानापूर तालुक्यातील डुक्करवाडी -फुलेवाडी येथील शारीरिकदृष्ट्या अपंग असलेले प्रसिद्ध कुंभार पुंडलिक मनोहर कुंभार यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना उन्हाळा हा मातीच्या भांड्यांसाठी एक उत्तम हंगाम असल्याचे स्पष्ट केले. आपण स्वतः खानापूरच्या मातीपासून पारंपारिक मडके, माठ, जग, ग्लास, सुरई आदिंसह स्वयंपाकाची भांडी बनवतो अशी माहिती देऊन अलीकडच्या काळात रेफ्रिजरेटर असलेले लोक देखील मातीच्या भांड्यांचे पाणी पिण्यास प्राधान्य देतात, असे ते म्हणाले.

 belgaum

खानापूरमधील माती ही मातीची भांडी बनवण्यासाठी देशातील सर्वोत्तम मानली जात असल्यामुळे येथील मातीच्या उत्पादनांना खूप मागणी आहे. तथापि उन्हाळ्याच्या महिन्यांत मागणीच्या तुलनेत उत्पादन अनेकदा कमी पडते असे सांगून त्यांनी नमूद केले की खानापूरमध्ये मातीच्या भांड्यांचे घाऊक दर 75 ते 500 रुपयांपर्यंत असतात, तर किरकोळ किमती 150 रुपयांपासून सुरू होऊन त्याहूनही जास्त होतात. कोरोना काळानंतर मातीच्या भांड्यांची लोकप्रियता वाढली आहे.

कारण लोक आरोग्याबाबत अधिक जागरूक झाले आहेत आणि नैसर्गिक पर्याय शोधत आहेत. “वॉटर प्युरिफायर आणि रेफ्रिजरेटेड पाण्याच्या दुष्परिणामांबद्दलच्या चिंतेमुळे अधिक ग्राहक मातीची भांडी आणि कॅम्पर्सची निवड करत आहेत,” असे त्यांनी पुढे सांगितले.Pot

बाजारपेठेतील निरीक्षणांवरून असे दिसून येते की मार्चपासून तापमान वाढू लागल्याने मातीच्या भांड्यांची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. तथापि, कर्नाटकने मातीच्या भांड्यांच्या अर्थात कुंभार उद्योगाचे महत्त्व ओळखले असूनही धोरणकर्ते आणि नियोजनकार अनेकदा कुंभार समुदायाकडे दुर्लक्ष करतात. याव्यतिरिक्त प्लास्टिक कंटेनर आणि रेफ्रिजरेटरचा वाढता वापर कुंभाराच्या पारंपारिक कलाकृतींना आव्हान देत आहे. तरीही कुंभारांची जुनी पिढी त्यांचा वारसा जपण्याबाबत आशावादी आहे.

पुंडलिक कुंभार स्वतः त्यांच्या ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत शुध्द फिल्टर केलेले पिण्याचे पाणी उपलब्ध असेल अशा मातीच्या पाण्याच्या बाटल्या सादर करण्याच्या प्रकल्पावर काम करत आहेत. अद्याप हा प्रकल्प जरी संशोधनाच्या टप्प्यात असला तरी, त्यात बाजारपेठेत क्रांती घडवून आणण्याची आणि पारंपारिक विविध मातीच्या भांड्यांना शाश्वत भविष्य प्रदान करण्याची क्षमता आहे, असा विश्वास कुंभार यांनी शेवटी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.