बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाकडून आज सकाळी शहर परिसरातील काळ्या यादीतील 200 गुंडांचे अर्थात रावडी शीटर्सचे पुनरावलोकन करण्याची कार्यवाही पार पाडण्यात आली. यावेळी सद्वर्तनाबद्दल सुमारे 10 जणांची नावे रावडी शीट मधून वगळण्याचा आदेश मी दिला आहे, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी दिली.
पोलीस प्रशासनातर्फे आज शनिवारी सकाळी पोलीस परेड ग्राउंडवर शहर परिसरातील रावडी शीटर्सची ओळख परेड घेऊन पुनरावलोकन करण्यात आले. या कार्यवाहीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पोलीस आयुक्त मार्बन्यांग बोलत होते. उपस्थित रावडी शीटर्सशी मी संवाद साधून त्यांना चार हिताच्या गोष्टी सांगितल्या आहेत. आजच्या या पुनरावलोकन कार्यवाहीत मला असे आढळून आले की कांही रावडी शीटर्स 10 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक काळापासून काळ्या यादीत आहेत. तसेच या काळात त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
थोडक्यात संबंधित सुमारे 10 रावडी शिटर्स हे आपल्या सद्वर्तनाने समाजात सन्मार्गाला लागल्याचे स्पष्ट होत असल्यामुळे त्यांची रावडी शीट बंद करण्याचा आदेश मी दिला आहे.
याव्यतिरिक्त काळा यादीत आल्यानंतर काहींवर एखाद दुसरा गुन्हा नोंद झाला आहे. अशा गुंडांना मी चांगले वागण्याचा सल्ला दिला असून तसे केल्यास त्यांचे नांवही काळ्या यादीतून काढण्याचे आश्वासन दिले आहे, असे पोलीस आयुक्त मार्बन्यांग यांनी पुढे सांगितले.
रावडी शिटर यादीतून मुक्त झालेल्या इतरांचा आदर्श घेऊन बऱ्याच जणांनी आपल्या वर्तनात चांगली सुधारणा केली आहे. हे वर्तन पुढे कायम ठेवल्यास अशा गुंडांची नावे देखील मी येत्या काळात रावडी शीटमधून वगळणार आहे. रावडी शीटर्सनी देखील यापुढे आम्ही गुंडगिरी न करता समाजात चांगले वर्तन करू, असे सांगितले आहे. एखाद्याचे नांव काळ्या यादीत अर्थात रावडी शीटमध्ये घालायचे किंवा काढायचे याला कांही नियम आहेत.
सर्वसामान्यपणे सातत्याने दगडफेक, मारामाऱ्यांच्या स्वरूपात हिंसा, थोडक्यात शारीरिक हिंसा करणाऱ्याचे नांव रावडी शिटर यादीत समाविष्ट केले जाते अशी माहिती देऊन कायद्यासमोर महनीय, अतीमहणीय व्यक्ती या गोष्टी गौण आहेत. कायदा सर्वांसाठी समान आहे, असे शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी शेवटी स्पष्ट केले.