बेळगाव लाईव्ह :यंदाच्या 2025 -26 सालच्या आर्थिक वर्षासाठी बेळगाव महानगरपालिकेचे 10 लाख 35 हजार रुपये इतके शिलकीचे अर्थात बचतीचे अंदाजपत्रक आज शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये कर, अर्थ आणि अपील स्थायी समितीच्या अध्यक्षा नेत्रावती भागवत यांनी सादर केले.
महापालिका सभागृहात झालेल्या बैठकीमध्ये अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर त्यावर फारशी गंभीर चर्चा झाली नाही. तथापि प्रशासकीय आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी नामनिर्देशितपणे बोलून कांही तासातच बैठक गुंडाळली.
यंदाच्या 2025 -26 या आर्थिक वर्षासाठी महापालिकेचे एकूण उत्पन्न 441 कोटी 99 लाख 43 हजार रुपये असून खर्च एकूण 441 कोटी 89 लाख 8 हजार रुपये अंदाजीत आहे. या पद्धतीने चालू वर्षात 10 लाख 35 हजार रुपये बचत होण्याची अपेक्षा आहे.
महापालिकेकडून ज्येष्ठ नागरिक, मागासवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला शाळकरी मुले आणि दिव्यांगांच्या फायद्यासाठी अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील चौक, रस्ते आणि बस स्थानकाचे सौंदर्यीकरण हे प्रमुख प्रकल्प आहेत.
शहरातील दररोजच्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी खुल्या जागा पार्किंग आणि बाजारासाठी रूपांतरीत करून पालिकेचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने योजना आखण्यात आली असल्याचे अध्यक्षा भागवत यांनी बैठकीत बोलताना सांगितले.
अंदाजित उत्पन्न : 1) महापालिकेच्या हद्दीतील मालमत्तांचा गोळा केलेला मालमत्ता कर अंदाजे 7808.38 लाख रुपये निश्चित करण्यात आला आहे. हा कर वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबवून सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मालमत्तेची माहिती सॉफ्टवेअरमध्ये नोंदवण्याद्वारे जनतेला मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल. 2) इमारती परवान्यांमधून विकास शुल्क सुधारणा शुल्कातून 1003 लाख उत्पन्न अपेक्षित आहे. 3) मोडकामातून 185 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.
4) पालिकेच्या रिकाम्या जागांच्या विक्रीतून 1050 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. 5) एसएफसी अनुबंधित निधी अनुदानाखाली 710 लाख रुपये अपेक्षित आहेत. या रकमेपैकी 29 टक्के रक्कम राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आऊटसोर्सिंग नागरिक कर्मचाऱ्यांच्या पगार आणि संकट भत्त्यासाठी वापरण्यात येईल. 6) एसएफसी वीज अनुदान 5200 लाख रुपये अपेक्षित आहे. सोडलेली रक्कम थेट वीज विभागाला भरण्यात येईल. 7) 16 व्या वित्त आयोगाचे अनुदान 2000 लाख रुपये अपेक्षित आहे. 8) हेस्कॉम विभागाकडून केबल टाकण्याच्या शुल्कातून 1700 लाख रुपये उत्पन्न पुन्हा निश्चित करण्यात आले आहे. 8) पालिकेच्या हद्दीत रस्ते खोदकामातून 275 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.
9) घनकचरा व्यवस्थापनातून गोळा केलेली रक्कम 975 लाख रुपये उत्पन्नाच्या स्वरूपात अपेक्षित आहे. 10) स्थावर मालमत्तेच्या नोंदणीतून अधिभार शुल्क 110 लाख रुपये नोंदणी विभागाकडून अपेक्षित आहे. 11) मालमत्ता हस्तांतरण फी, दंडातून अंदाजे उत्पन्न 80 लाख रुपये अपेक्षित आहेत. एकंदर अशाप्रकारे बेळगाव महापालिकेला एकूण 44,199.43 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.
अंदाजीत खर्च : 1) महापालिकेच्या नागरिक कर्मचाऱ्यांना दरमहा संकट भत्ता 2000 रुपये, एकूण 250 लाख आणि जेवण भत्ता 35 रुपये दररोज, एकूण 150 लाख रुपये पालिकेच्या स्वतःच्या निधीतून भरण्यात येईल. 2) बेळगाव ला स्वच्छ शहर ठेवण्यासाठी आऊट सोर्सिंग स्वच्छता खर्चासाठी 2932 लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. 3) थेट नियुक्ती असलेल्या नागरिक कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 100 लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. 4) वैज्ञानिक घनकचरा विल्हेवाटीसाठी 400 लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. 5) रस्ते गटारी पादचारी पावसाचे पाणी व्यवस्थापन विहिरींची खोली वाढवणे यासाठी 925 लाख रुपये निश्चित करण्यात आले आहेत. 6) महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यावरील कुत्र्यांच्या व्यवस्थापनासाठी 75 लाख रुपये. 7) पालिकेच्या उत्पन्नातून सर्व विमा आणि हमी वगळता उपलब्ध असलेल्या 1 टक्का रकमेतून 3.75 लाख रुपये खेळासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. 8) पत्रकार कल्याण निधीसाठी 50 लाख रुपये निश्चित करण्यात आले आहेत.
9) पालिकेचे हद्दीतील स्मशानभूमीत दहनक्रिया आणि विकासासाठी 75 लाख रुपये निश्चित करण्यात आले आहेत. 10) महापालिकेच्या हद्दीत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, खुल्या विहिरी विकसित करण्यासाठी 157 लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.
भांडवली खर्च : 1) शहरातील 58 प्रभागांमध्ये नवीन रस्ते बांधकामासाठी 500 लाख रुपये, सीसी रस्ते बांधकामासाठी 100 लाख रुपये, गटार बांधकामासाठी 400 लाख रुपये, महापालिकेच्या खुल्या जागांच्या संरक्षणासाठी 100 लाख रुपये आणि शहराच्या प्रवेशद्वाराच्या सौंदर्यकरणासाठी 50 लाख रुपये अशा प्रकारे एकूण 2700 लाख रुपये मूलभूत सुविधांसाठी आणि शहरातील 58 प्रभागांमध्ये विविध आवश्यक मूलभूत सुविधांसाठी निश्चित करण्यात आले आहेत. 2) 100 लाख रुपये नवीन संगणकीकरण व यंत्रसामग्री खरेदीसाठी निश्चित करण्यात आले आहेत आणि पालिकेत ई -ऑफिस बांधकामासाठी 25 लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. 3) पालिकेच्या हद्दीतील उद्यानांच्या विकासासाठी 320 लाख रुपये निश्चित करण्यात आले आहेत 4) कुत्र्यांच्या आश्रयासाठी 20 लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. 5) दोन नवीन शववाहिका खरेदीसाठी 40 लाख रुपये निश्चित करण्यात आले आहेत. 6) अंतर्गत गटार दुरुस्ती आणि नवीन अंतर्गत गटार बांधकामासाठी तसेच समुदाय, सार्वजनिक स्वच्छतागृह बांधकामासाठी 600 लाख रुपये निश्चित करण्यात आले आहेत. 7) 24.10 टक्के, 7.25 टक्के आणि 5 टक्के पालिकेकडून निव्वळ वसुली होणाऱ्या कराच्या आधारावर अंदाजे 328.19 लाख रुपये पालिकेच्या अनुदानातून राखीव ठेवण्यात येतील. 8) एसएफसी निधीतून सोडलेल्या 29 टक्के रकमेचा पूर्ण वापर करण्यात येईल. 9) याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या 15 व्या वित्त योजना, महात्मा गांधी शहरी विकास योजना, स्वच्छ भारत मिशन, अमृत योजना, पावसाचे पाणी संग्रहण, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, स्वच्छ भारत अभियान योजना, एसएफसी विशेष अनुदान, गृहभाग्य योजना इत्यादींमधून मिळणाऱ्या अनुदानाच्या आधारावर आणि मार्गदर्शक तत्त्वाचा विचार करून कृती योजना तयार करून सक्षम प्राधिकरणाकडून मंजुरी घेऊन प्राधान्याने निधी वापरण्यात येईल, असे बैठकीत सांगण्यात आले.
अंदाजपत्रक जाहीर केल्यानंतर स्थायी समितीच्या अध्यक्षा नेत्रावती भागवत यांनी अंदाजपत्रकाची प्रत महापौरांकडे सुपूर्द केली याप्रसंगी महापालिका आयुक्त शोभा बी. हजर होत्या. दरम्यान बेळगावात नुकत्याच घडलेल्या कन्नड -मराठी वादाच्या पार्श्वभूमीवर अंदाजपत्रकाची प्रत सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. आयुक्त शुभा बी. यांच्या विशेष प्रयत्नामुळे अंदाजपत्रकाच्या पुस्तिकेचे मुखपृष्ठ कन्नड ध्वजाच्या पिवळ्या -लाल रंगात तयार करण्यात आले आहे.