बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील राणी चन्नम्मा सर्कल या सार्वजनिक ठिकाणी बेळगावातील सामान्य नागरिक व इतरांना त्रास देणारी रस्त्यावर अडथळा निर्माण करणारी आंदोलने करण्यास परवानगी दिली जाऊ नये. जिल्हा प्रशासन व पोलीस खात्याने आंदोलनकर्त्यांना सर्वसामान्य नागरिकांना त्रास न होता, अडथळा निर्माण न करता शांततेने आंदोलन करता यावे अशी स्वतंत्र वेगळी जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. जर असे घडले नाही आणि आंदोलनांसाठी रस्ते बंद केले गेले तर बेळगावातील सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या सार्वजनिक रस्त्यांवर अडथळा निर्माण करण्यास परवानगी दिल्याबद्दल मला प्रशासनाविरुद्ध कायदेशीर कारवाई करणे भाग पडेल, असा इशारा प्रसिद्ध कायदे पंडित ॲड. सचिन बिच्चू यांनी एका पत्राद्वारे जिल्हाधिकारी आणि बेळगाव शहर पोलीस आयुक्तांना दिला आहे.
बेळगाव जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये गेल्या 30 वर्षापासून वकिली व्यवसाय करणाऱ्या ॲड. बिच्चू यांच्या पत्रात पुढील आशयाचा तपशील नमूद आहे. मी हिंदवाडीत राहतो. त्यामुळे न्यायालयात पोहोचण्यासाठी मला दररोज कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल मार्गे जावे लागते. माझ्याप्रमाणेच असंख्य वकिलांना न्यायालयात जाण्यासाठी या सर्कल मार्गे ये -जा करावी लागते.
वकिलांव्यतिरिक्त मुख्य शहरात येण्यासाठी महांतेशनगर, शिवबसवनगर, रामतीर्थनगर, माळमारुती वगैरे ठिकाणच्या बेळगाव उत्तर मधील रहिवाशांना याच सर्कल मार्गे जावे लागते. याखेरीज राष्ट्रीय महामार्गावरून गोव्याकडे किंवा महाराष्ट्राच्या काही भागांकडे जाणारी अवजड वाहने याच चन्नमा सर्कल मार्गे मार्गक्रमण करत असतात त्यामुळे हा सर्कल कायम सततच्या रहदारीने व्यस्त असतो. अनेक सामाजिक राजकीय आणि इतर संघटनांकडून सातत्याने या सर्कलचा वापर आंदोलन, निदर्शनं करण्यासाठी केला जातो. असेही दिसून येते की जेव्हा 10:20 किंवा 50 लोक या सर्कलमध्ये आंदोलन करतात आणि मग जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यासाठी निघून जातात. या सर्व कालावधीत साध्या दुचाकीसह सर्वच वाहनांच्या संचारासाठी सदर सर्कल संपूर्णपणे बंद केला जातो. ही सर्व आंदोलनं साधारण सकाळी 10:30 वाजता सुरू होतात आणि जवळपास दुपारी 12 वाजेपर्यंत चालतात आणि बऱ्याचदा या सर्व कालावधीत चन्नम्मा सर्कल मार्गे जाणारे सर्व रस्ते बंद केले जातात.
या पद्धतीने दीर्घकाळ रस्ते बंद करण्यात आल्यामुळे या सर्कलच्या दिशेने जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊन त्याचा मोठा त्रास लोकांना होतो. आम्हा वकील मंडळींना तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा या समस्येला सामोरे जावे लागते.
त्यामुळे न्यायालयात पोहोचण्यास आम्हाला विलंब होतो आणि या विलंबामुळे बऱ्याचदा अनेक वकिलांना प्रतिकूल आदेशांना सामोरे जावे लागते. आंदोलन करणारे लोक बऱ्याचदा दीर्घकाळ रस्ता अडवून धरतात. अशावेळी न्यायालयात पोहोचण्यासाठी रहदारी पोलिसांकडून पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला जात नाही.
खरंतर राणी चन्नम्मा सर्कल या सार्वजनिक ठिकाणी बेळगावातील सामान्य नागरिक व इतरांना त्रास देणारी रस्त्यावर अडथळा निर्माण करणारी आंदोलने करण्यास परवानगी दिली जाऊ नये. जिल्हा प्रशासन व पोलीस खात्याने आंदोलनकर्त्यांना सर्वसामान्य नागरिकांना त्रास न होता, अडथळा निर्माण न करता शांततेने आंदोलन करता यावे अशी स्वतंत्र वेगळी जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. कॉलेज रोड ते सरदार हायस्कूल पर्यंत न्यायालयाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जुनी वाहने कायमस्वरूपी पार्क केलेली असतात या पद्धतीने अडथळे असलेला हा रस्ता देखील वेळेवर न्यायालयात पोहोचण्यासाठी वापरता येत नाही. तरी माझी विनंती आहे की राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे कोणत्याही सामाजिक राजकीय अथवा अन्य संघटनांना कोणत्याही प्रकारचे आंदोलन किंवा मोर्चा मिरवणुका काढून सर्कल किंवा सर्कलच्या दिशेने जाणारे रस्ते अडवण्यास परवानगी दिली जाऊ नये जर असे कोणी केल्यास आपण कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई करून रस्ता तात्काळ खुला करणे गरजेचे आहे. जर असे घडले नाही आणि आंदोलनांसाठी रस्ते बंद केले गेले तर बेळगावातील सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या सार्वजनिक रस्त्यांवर अडथळा निर्माण करण्यास परवानगी दिल्याबद्दल मला प्रशासनाविरुद्ध कायदेशीर कारवाई करणे भाग पडेल, असे ॲड. सचिन बिच्चू यांच्या जिल्हाधिकारी आणि बेळगाव शहर पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात नमूद आहे. या पत्राच्या प्रती मार्केट पोलीस स्टेशन, खडेबाजार पोलीस स्टेशन व कॅम्प पोलीस स्टेशनला देखील धाडण्यात आल्या आहेत.