बेळगाव लाईव्ह : बेंगळुरू येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्यानंतर बेळगावमध्ये निषेध करण्यासाठी जमलेल्या आंदोलकांनी सरकारी वाहनांवर दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली कॅम्प आणि खडेबाजार पोलीस स्थानकात ४१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यापैकी १२ जणांनी आपल्यावर दाखल करण्यात आलेली तक्रार खोटी असल्याचे सांगत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयाने निकाल सुनावत १२ जणांवरील आरोप फेटाळून खटला रद्द केला.
१७ डिसेंबर २०२१ रोजी मध्यरात्री बेळगावातील खडेबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरकारी वाहनांची तोडफोड केल्याच्या आरोपाखाली ४१ जणांविरोधात तक्रार दाखल केली होती.
बेळगावमध्ये भरलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आल्याचा आरोपहि तक्रारीत नमूद करण्यात आला होता.. रेल्वेस्थानकानजीक नवरत्न पॅलेस येथे बेंगळुरूहून आलेल्या काही अधिकाऱ्यांची वाहने पार्किंगमध्ये उभारण्यात आली होती.
दरम्यान बेंगळुरू येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बेळगावमधील काही तरुणांनी अचानक वाहनावर दगडफेक केल्याचा आरोप करत ४१ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच खडेबाजार पोलीस ठाण्याचे तत्कालीन पीएसआय आर.बी. सोंडगर आणि निरीक्षक दिलीप निंबाळकर यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला होता.
ही घटना घडण्याआधीच बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काळे फासण्याचा प्रकार घडला होता. त्या घटनेच्या निषेधार्थ काही आंदोलक बेळगावातील धर्मवीर संभाजी चौकात जमले होते. याच दरम्यान पाच ते सहा जणांनी दुचाकीवरून येऊन सरकारी वाहनांची तोडफोड करून पलायन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या प्रकरणी खडेबाजार आणि कॅम्प पोलीस ठाण्यात भादंवि कलम 143, 147, 148, 427, 153, 109 आणि सार्वजनिक मालमत्तेच्या संरक्षण कायद्याच्या कलम 3 (1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील १२ जणांची नावे रद्द करण्यात आली असून, त्यामध्ये सरिता विराज पाटील, सुनील प्रकाश लोहार, रोहित महादेव माळगी, विनायक संजय सुतार, विनायक उर्फ मयप्पा परशुराम, ज्ञानानंद दत्ता बडस्कर, सूरज सुभाष गायकवाड, राहुल रमेश सावंत, विकी प्रकाश मंडोळकर, भालचंद्र दत्ता बडस्कर, राजेंद्र गौतम बैलूर आणि श्रेयश सुहास खटावकर आदींचा समावेश आहे. ॲड राम घोरपडे यांनी वकील म्हणून काम पाहिले.