बेळगाव लाईव्ह : धुली वंदनादिवशी चव्हाट गल्ली येथे बंदी घातलेली डॉल्बी सिस्टीम लावण्याबरोबरच त्यावर महाराष्ट्र गीत वाजवल्याचा ठपका ठेवत मार्केट पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कन्नड संघटनांच्या दबावातून हे घडल्याचे बोलले जात आहे.
मार्केट पोलीस ठाण्यातील एका हवालदारने दिलेल्या फिर्यादीवरून वैभव लक्ष्मण गावडे (रा. गोजगा), सुनील विजय जाधव (रा. चव्हाट गल्ली) आणि डॉल्बी ऑपरेटर अशा तिघांविरुद्ध भा.द.वि. कलम 192, 285, 292 व कर्नाटक पोलीस कायदा कलम 36, 37, 109 एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
चव्हाट गल्ली येथील नाना पाटील चौक परिसरात गेल्या शुक्रवारी 14 मार्च रंगपंचमी दिवशी रस्त्यावर अडथळा ठरेल अशा पद्धतीने डॉल्बी सिस्टीम लावण्यात आली होती.
त्याचप्रमाणे या डॉल्बीवर जय जय महाराष्ट्र माझा… हे महाराष्ट्र गीत वाजवल्याचा ठपका ठेवण्याबरोबरच डॉल्बीसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती असाही ठपका फिर्यादित ठेवण्यात आला आहे.
कर्नाटकात जय महाराष्ट्र म्हणणे गुन्हा ठरू शकत नाही कांही महिन्यापूर्वी खुद्द उच्च न्यायालयाने स्पष्ट करून तसा निर्णय दिला आहे. होळी सारख्या सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्र गीत वाजल्याने देखील गुन्हा ठरणे कठीण आहे त्यामुळे मराठीच्या आकसापोटी गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला जात आहे.
सुनील जाधव हे गेल्या दोन वर्षे गल्लीच्या अनेक सामाजिक कार्यक्रमात पुढाकार घेत असतात ते सक्रिय सामाजिक कार्यकर्ते आहेत अश्यात महाराष्ट्र गीत वाजवल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे गल्लीतील नागरिकात नाराजी व्यक्त होत आहे.
मात्र तरीही मार्केट पोलिसांनी परवाच्या रंगपंचमी दिवशी महाराष्ट्र गीत वाजवल्यावरून गुन्हा नोंदवला आहे. महाराष्ट्र गीत वाजवणे गुन्हा ठरू शकतो तर राजस्थान किंवा पंजाबचे आपले बांधव जेंव्हा होळी साजरी करतात त्यावेळी ते आपल्या राज्याभिमानाची गाणी वाजवतात त्याचे काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.