बेळगाव लाईव्ह : बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकावर दागिने चोरी केलेल्या तिघांना मार्केट पोलिसांनी अटक करत त्यांच्याजवळील 12 लाख 72 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहे.
दागिने चोरीला गेलेल्या केवळ तीन दिवसातच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींना गजाआड करण्याची कामगिरी बजावली आहे यामुळे मार्केट पोलिसांचे कौतुक होत आहे.
अनिता नितीना चौगुले, वय 40, रा. शिवबसव नगर, गँगवाडी, बेळगाव, सिम्पल श्रीकांत लोंडे, वय 35 रा. शिवबसव नगर गँगवाडी, बेळगाव आणि
निशा शंकर लोंडे, वय 25 रा. शिवबसव नगर, गँगवाडी, बेळगाव अशी या चोरट्यांची नावे आहेत.
या प्रकरणी समजलेल्या अधिक माहिती नुसार 15 मार्च 2025 रोजी बेळगावातील सेंट्रल बस स्टँडवरील गर्दीच्या ठिकाणी प्रवासी बसमधून उतरत असताना
श्रीमती कांचन विश्वनाथ गौडा, नेहरू नगर, गोकुळ रोड, हुबळी यांचे दागिने चोरण्यात आले होते त्यानुसार कांचन यांनी मार्केट पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.
सदर प्रकरणी मध्यवर्ती बसस्थानकावरील चोरीला गेलेल्या वस्तू आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस आयुक्तांनी , मार्केट पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धामन्नावार यांच्या नेतृत्वाखाली एच.एल. केरुरा, पीएसआय मार्केट आणि गुन्हे शाखेचे कर्मचारी यांचा समावेश असलेली एक पथक स्थापन केले होते या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी या आरोपींकडून 143 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत या कारवाई बद्दल पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी मार्केट पोलिसांचे अभिनंदन केले आहे.