बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील अयोध्या नगर परिसरात एका ऑटोरिक्षाने अचानक पेट घेतल्याने एकच गोंधळ उडाला. आग इतकी भीषण होती की काही क्षणातच संपूर्ण रिक्षा जळून खाक झाली. इतकेच नव्हे, तर आजूबाजूला उभ्या असलेल्या पाचहून अधिक दुचाकींचे देखील आगीत नुकसान झाले आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर घटनास्थळी असलेल्या नागरिकांची धावाधाव सुरु असतानाच आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण स्पष्ट झाले नाही. मात्र काही वेळातच सदर रिक्षाला वैयक्तिक वादातून आग लावल्याचे कारण पुढे आले.
याबाबत अधिक माहिती अशी कि, बेळगावच्या कोल्हापूर सर्कल परिसरात असलेल्या खासगी रुग्णालयाच्या मागील बाजूस शुक्रवारी दुपारी अचानक एका रिक्षाने पेट घेतला. हि रिक्षा हलगा येथील प्रशांत लक्ष्मण बोंम्मण्णावर यांच्या मालकीची असून रिक्षा थांब्यावर भाड्यासाठी झालेल्या वादानंतर राहुल आणि जगदीप या दोघांनी दिलेल्या धमकीनुसार रिक्षा पेटवून देण्यात आल्याची तक्रार रिक्षाचालकाने केली आहे. याबाबत रिक्षाचालकाने माळमारुती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
भर दुपारी घडलेल्या आगीच्या थरारामुळे उपस्थित नागरिक भयभीत झाले. उपस्थितांची धावाधाव सुरु झाली. नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु रिक्षाला लागलेल्या आगीत रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
रिक्षाला लागलेल्या आगीच्या झळा पसरल्याने आसपास उभारण्यात आलेल्या जवळपास ५ हुन अधिक दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.