Sunday, March 16, 2025

/

महाराष्ट्रात चमकतोय बेळगावचा युवा फुटबॉलपटू

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगावात शिक्षण घेत असलेला कडोली (ता. जि. बेळगाव) येथील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये हजेरी लावलेला होतकरू युवा फुटबॉलपटू निवृत्ती सुनील पावनोजी हा सध्या महाराष्ट्रात चमकत आहे. कोल्हापूरच्या पाटाकडची तालीम मंडळ (PTM)संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निवृत्ती याने कालच्या शुक्रवारी आपल्या संघाला भव्य बक्षीस रकमेच्या सतेज चषक खुल्या फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

बेळगाव तालुक्यातील कडोली येथील शेतकरी सुनील अप्पय्या पावनोजी यांचा चिरंजीव असलेल्या निवृत्ती याचे शालेय शिक्षण बेळगावच्या फिनिक्स हायस्कूलमध्ये झाले असून सध्या तो लिंगराज कॉलेजमध्ये बीए तिसऱ्या सेमिस्टरमध्ये शिकत आहे.

वयाच्या पाचव्या वर्षापासून फुटबॉलचे धडे घेणाऱ्या निवृत्ती पावनोजी याने फिनिक्स शाळेत शिकताना स्थानिक स्पर्धा तर गाजवल्याच, त्याखेरीज तीन वेळा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये आणि एकदा ‘खेलो इंडिया’मध्ये देखील आपली चमक दाखवली आहे.

यापूर्वी बेंगलोर येथील स्टुडन्ट युनियन क्लबतर्फे खेळणारा निवृत्ती तेथून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन सध्या तीन महिन्यांपासून पाटाकडची तालीम मंडळाच्या संघातून खेळत आहे. कोल्हापूर येथील 2 लाख रुपये बक्षीस रकमेच्या सतेज चषक खुल्या फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात 20 वर्षीय निवृत्ती पावनोजी याने फॉरवर्ड स्थानावर खेळताना लागोपाठ तीन गोल करून हॅटट्रिक नोंदविण्याद्वारे साऱ्यांची वाहव्वा मिळवली.Football

त्यानंतर काल शुक्रवारी झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील आपल्या संघातर्फे पहिला गोल निवृत्तीनेच नोंदवला. त्यानंतर पाटाकडची तालीम मंडळ संघाने प्रतिस्पर्धी खंडोबा तालीम मंडळ संघाला 4 -2 अशा गोल फरकाने पराभूत करून विजेतेपद हस्तगत केले. यावेळी स्पर्धेतील चमकदार कामगिरीबद्दल निवृत्ती पावनोजी याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला.

या पद्धतीने मोठा मुलगा फुटबॉल क्षेत्रात चमकत असताना शेतकरी सुनील पावनोजी यांची कन्या म्हणजे निवृत्ती याची धाकटी बहीण इंद्रायणी ही देखील फुटबॉल खेळात मागे नाही हे विशेष होय.

भगवान महावीर इंग्लिश मीडियम स्कूल, भूतरामनहट्टी या शाळेत इयत्ता आठवी मध्ये शिकणारी इंद्रायणी ही देखील फुटबॉल खेळात प्रवीण असून तिने यावर्षीच्या राज्यस्तरीय राज्यस्तरीय व मिनी ऑलम्पिक फुटबॉल स्पर्धेत सहभाग दर्शवला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.