बेळगाव लाईव्ह : कार्यक्रम बसवन कुडची (ता. जि. बेळगाव) येथे परवा यात्रेनिमित्त पळवण्यात आलेल्या आंबिल गाड्यांपैकी एका गाड्याच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झालेल्या युवकाचा दुर्दैवाने उपचाराचा फायदा न होता मृत्यू झाला आहे.
मयत इसमाचे नांव अप्पण्णा पारिश पाटील (वय 27) असे आहे. बेळगाव तालुक्यातील बसवान कुडची येथे यात्रेनिमित्त परवा गेल्या सोमवारी माळरानावर आंबिलगाडे पळविण्याचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला.
मात्र या कार्यक्रमाप्रसंगी बेभान धावणाऱ्या आंबील गाड्यांपैकी एका गाड्यासोबत धावताना दुसऱ्या एकाचा धक्का लागून अप्पण्णा जमिनीवर कोसळला त्यानंतर क्षणार्धात वेगात असलेल्या आंबील गाड्याचे चाक त्याच्या अंगावरून गेले.
तेंव्हा उपस्थित गावकऱ्यांनी तत्परतेने जखमी अप्पण्णा याला धावणाऱ्या गाड्यांच्या मार्गातून बाजूला काढले. तसेच त्यानंतर उपचारासाठी त्याला तातडीने एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
तथापि दुर्दैवाने उपचाराचा फायदा न होता अप्पण्णा पाटील याचे निधन झाले सदर घटनेची माळमारुती पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.