बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील गणाचारी गल्ली येथील 100 वर्षांपेक्षाही जुन्या असलेल्या बकरी मंडईमध्ये संबंध नसलेले इतर कोणतेही विकास काम केले जाऊ नये. सदर जागा ही शेळ्या -मेंढ्या बकऱ्यांच्या बाजारासाठीच राखीव ठेवावी, अशी मागणी खाटीक समाज बकरी मंडई गणाचारी गल्लीचे अध्यक्ष आणि समस्त बकरी विक्रेते व व्यापाऱ्यांकडून जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी (डीसी) व मनपा आयुक्तांना सादर करण्यापूर्वी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना खाटीक समाजाचे नेते माजी नगरसेवक राकेश पलंगे यांनी सांगितले की, गणाचारी गल्ली येथील खाटीक समाजाची बकरी मंडई 100 वर्षापेक्षा अधिक काळापासून अस्तित्वात आहे. गेल्या अनेक वर्षापासून आमदार, खासदार, नगरसेवक वगैरे लोकप्रतिनिधी या ठिकाणी भेट देऊन आमच्या समाजाची विचारपूस करतात. तसेच बकरी मंडईच्या विकासासाठी वेळोवेळी थोडाफार निधी देऊन सहकार्य करत असतात.
यापूर्वीच्या या लोकप्रतिनिधींकडून आम्हाला कोणताही त्रास झालेला नाही. मात्र आत्ताचे विद्यमान नगरसेवक शंकर पाटील हे क्षुल्लक कारणावरून अढी धरून विनाकारण खाटीक समाजाला त्रास देत आहेत. बकरी मंडईच्या जागेत आपण समुदाय भवन बांधणार आहोत असे धमकावत आहेत. सदर मान्य आहे की ही जागा महापालिकेची आहे मात्र महापालिकेतील बकरी मंडईच्या जागेच्या दोन्ही उताऱ्यावर ‘शिप मार्केट’ म्हणून नोंद आहे. ही वस्तुस्थिती माहीत असूनही नगरसेवक शंकर पाटील आपल्या कार्यकर्त्यांसमवेत बकरी मंडईत येऊन समुदाय भवन उभारण्याची धमकी देऊन त्रास देत आहेत.
मंडईतील खाटीक समाजाच्या श्री बिरदेव मंदिराचा फलक देखील त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगून पाडला आहे. खाटीक समाजाच्या नावावर शंभरहून अधिक वर्षापासून असलेल्या मंडईच्या जागेत मिळालेल्या निधीतून आम्ही शक्य होईल तितका विकास केला आहे. या ठिकाणी आमच्या समाजाचे कार्यालय, श्री बिरदेव मंदिर व श्री गणपती मंदिर आहे. जागेत स्वच्छता राखण्याबरोबरच आम्ही या ठिकाणी दरवर्षी यात्राही भरवतो.
ही वस्तुस्थिती असताना नगरसेवक पाटील महापालिकेत एकाचे दोन सांगून आम्हाला त्रास देत आहे. या ठिकाणी जुन्या काळापासून आमच्या पुजाऱ्यांचे घर आहे. ते घर देखील जेसीबीच्या सहाय्याने हटवण्याची दादागिरी नगरसेवक शंकर पाटील करत आहे त्याचे कार्यकर्ते पुजाऱ्यांच्या कुटुंबातील महिलांना वाटेल तसे बोलत असतात. तरी याची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.
तसेच मंडईशी संबंध नसलेले समुदाय भवन वगैरे कोणतेही विकास काम बकरी मंडईच्या ठिकाणी करू नये अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसह महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे करणार आहोत, अशी माहिती माजी नगरसेवक पलंगे यांनी दिली. याप्रसंगी खाटीक समाजातील नागरिक आणि महिलावर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.