बेळगाव लाईव्ह : बेळगावातील अनगोळ परिसरातील नागरिकांनी अनगोळ बस शेवटच्या थांब्यापर्यंत म्हणजेच लक्ष्मी मंदिर-गांधी स्मारकापर्यंत चालवण्याची मागणी करत नुकतेच बेळगाव परिवहन विभागाच्या विभागीय नियंत्रकांना माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर केले होते. सदर निवेदनातील मागणीची दखल घेत अनगोळ भागात बससेवा पूर्ववत करण्यात आल्याने नागरीकातून समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून ही सेवा शाळा क्रमांक 34 पर्यंतच मर्यादित राहिली होती. रस्ते दुरुस्तीनंतरही बस पूर्ण मार्गावर धावत नसल्याने अनगोळ भागातील नागरिकांनी बेळगाव परिवहन विभागाच्या विभागीय नियंत्रकांना निवेदन देत अनगोळ बस शेवटच्या थांब्यापर्यंत सुरू करण्याची मागणी केली.
लक्ष्मी मंदिर गांधी स्मारक हा शेवटचा थांबा असून, सांडपाणी वाहिनीच्या कामामुळे ही बससेवा दोन वर्षांपूर्वी शाळा क्रमांक 34 पर्यंतच मर्यादित करण्यात आली होती. नागरिकांच्या तक्रारीनंतर शहर महापालिकेने संबंधित रस्ता दुरुस्त करून तो वाहतुकीसाठी योग्य केला आहे. मात्र, बस चालक व वाहक शेवटच्या थांब्यापर्यंत बस नेण्यास तयार नाहीत. यामुळे महिला, जेष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी तसेच रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
शिवाय त्यांना रोज 1.5 ते 2 किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागत आहे. या समस्येवर अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, मात्र अद्याप उपाययोजना झाल्या नाहीत. जर त्वरित बस सेवा लक्ष्मी मंदिर गांधी स्मारकापर्यंत सुरू झाली नाही, तर येथील नागरिकांनी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. सदर निवेदनाची दखल घेत अखेर अनगोळ भागात बससेवा पूर्ववत करण्यात आली.
आजपासून सदर बससेवा नियोजित मार्गावर पूर्ववत करण्यात आली असता स्थानिक नागरिकांनी बसचे जल्लोषात स्वागत केले. तसेच बसचे पूजन करून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी अजित पाटील, राजू पवार, भाऊ कावळे, टिळकवाडी पोलीस स्थानकाचे सीपीआर तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.