बेळगाव लाईव्ह : कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा प्रभाव सर्वच क्षेत्रांवर पडत असून माध्यम क्षेत्रही त्याला अपवाद नाही. याच पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये वार्त़ा विभाग आणि बेळगाव पत्रकार संघटनेतर्फे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि माध्यम या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत प्रसिद्ध तज्ज्ञ स्वप्नील पाटणेकर यांनी पत्रकारांना सखोल मार्गदर्शन केले.
बेळगावमध्ये वार्त़ा विभागाच्या सभागृहात सोमवारी आयोजित या कार्यशाळेत श्रेस्ठा आयटी कंपनीचे संस्थापक स्वप्नील पाटणेकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा माध्यम क्षेत्रावर होणारा प्रभाव यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी चॅटजीपीटी, डीपसीक, ग्रामरली आणि अन्य मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या भाषिक मॉडेल्सच्या प्रभावी वापराबद्दल मार्गदर्शन केले. तसेच इंटरनेटशिवायही या साधनांचा उपयोग कसा करता येतो, याबद्दल त्यांनी सखोल माहिती दिली.
स्वप्नील पाटणेकर यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा लाभ आणि धोके यांचा प्रात्यक्षिक दाखवून सविस्तर उलगडा केला. तसेच उपस्थित पत्रकारांच्या शंका दूर केल्या. पाटणेकर हे ‘सायबर सुरक्षा आणि थ्रेट डिटेक्शन’ या विषयावर पोलीस विभाग तसेच देश-विदेशातील गुप्तचर संस्थांना प्रशिक्षण देतात.
कार्यशाळेत बोलताना ज्येष्ठ पत्रकार ऋषिकेश बहादूर देसाई यांनी आधुनिक तंत्रज्ञान वेगाने विकसित होत असल्याचे सांगितले. आजच्या पत्रकारांनी कृत्रिम बुद्धिमत्तेची विविध टूल्स आत्मसात करणे गरजेचे असून त्यामुळे कामाचा दर्जा सुधारतो आणि वेळेची बचत होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
वार्त़ा आणि सार्वजनिक संपर्क विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर हे कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाच्या शेवटी रविंद्र उप्पार यांनी आभार मानले. या कार्यशाळेस बेळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध संस्थांचे वृत्तवाहिन्यांचे आणि डिजिटल माध्यमाचे देखील अनेक पत्रकार उपस्थित होते.