बेळगाव लाईव्ह :केएलई रुग्णालयाजवळ राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या एक्झिट जवळ काँक्रीट मिक्सर ट्रक एका केए-25 नोंदणीकृत कारवर कोसळून घडलेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली. सुदैवाने संबंधित दोघांच्या जीवावर न बेतता ते जखमी झाले असले तरी कारचा मात्र संपूर्ण चुराडा झाला आहे.
अपघातातील दोघेही जखमी बागलकोटचे रहिवाशी असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघाताची थोडक्यात माहिती अशी की, केएलई हॉस्पिटलजवळील राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या एक्झिट रस्त्याजवळ आज सकाळी एक काँक्रीट मिक्सर ट्रक संतुलन बिघडल्याने शेजारील एका केए-25 नोंदणीकृत कारवर उलटला.
सदर अपघातात चालकासह अन्य एक जण कारमध्ये जखमी अवस्थेत अडकून पडले होते. याबाबतची माहिती मिळताच रहदारी पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ बचाव कार्य हाती घेतले. काँक्रीट मिक्सर कोसळून कार चेपली गेली असल्यामुळे अपघात स्थळी त्वरेने क्रेन मागवण्यात आली.
अग्निशमन जवानांनी तातडीने जखमींच्या मदतीला धावून जात क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कारमधून त्यांना काळजीपूर्वक सुखरूप बाहेर काढले. कार गाडीचा संपूर्ण चुराडा होऊन देखील दैव बलवत्तर म्हणून जीव वाचलेल्या त्या जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी ताबडतोब केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सदर घटनेची रहदारी उत्तर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम करत आहेत. सदर अपघातामुळे परिसरातील वाहतूक तात्पुरती प्रभावित झाली होती.