बेळगाव लाईव्ह : परीक्षाकाळात विद्यार्थ्यांना मोफत बससेवा देण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. त्यामुळे आता परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचताना विद्यार्थ्यांना कोणत्याही वाहतुकीच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
बारावीची परीक्षा १ मार्चपासून तर दहावीची परीक्षा २१ मार्चपासून सुरू होत आहे. या काळात हॉलतिकीट दाखवून विद्यार्थ्यांना बसमध्ये विनामूल्य प्रवास करता येणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही सुविधा अधिक फायदेशीर ठरणार आहे, कारण काही परीक्षा केंद्रे २० ते २५ किलोमीटर अंतरावर आहेत.
याशिवाय, बसचालक आणि वाहकांना परीक्षार्थींना सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी बस थांबविण्याची विनंती केल्यास त्यांना शक्य ते सहकार्य करावे, असे परिवहन विभागाने सांगितले आहे.
ही सुविधा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरणार असून, परीक्षेच्या तणावात वाहतुकीच्या समस्यांमुळे अडथळा येऊ नये, हा यामागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी या मोफत बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.