बेळगाव लाईव्ह :शहरातील प्रतिष्ठित कॅम्प येथील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते किरण वाय. निप्पाणीकर (वय 47) यांचे आज गुरुवारी वाराणसी येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, बहीण, मेहुणे आणि पुतणे असा परिवार आहे. महापालिका अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांचे ते बंधू होते.
दयाळू आणि सामाजिकदृष्ट्या सक्रिय व्यक्ती म्हणून सुपरिचित असलेले किरण नेहमीच त्यांच्या सभोवतालच्या लोकांना मदत करण्यास तत्पर असत. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले होते. अलीकडेच दोन महिन्यापूर्वी बेळगावात सैन्य भरती मेळावा झाला. त्यासाठी शहरात देशभरातील शेकडो युवक दाखल झाले होते.
परगावच्या या युवकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांच्याकरिता भोजन व नाश्त्याची सोय करण्यात किरण निप्पाणीकर आघाडीवर होते. याखेरीज गरजू विद्यार्थी -विद्यार्थिनींना शैक्षणिक मदत मिळवून देण्याबरोबरच हजारो गरीब वंचित लोकांना त्यांनी या हाताचे त्या हाताला कळणार नाही या पद्धतीने मदत करून दिलासा दिला होता. बेळगाव शहरात अनेक ठिकाणी ट्री प्लांटेशन मध्येही त्यांचे योगदान महत्त्वाचे होते.
अशा या धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्याचे आकस्मिक निधन झाल्याने सर्व थरातून श्रद्धांजली व्यक्त होत आहे. महाशिवरात्र जवळ आल्याने किरण निप्पाणीकर आपल्या मित्रांसमवेत प्रयागराज येथे गेले होते. तिथून माघारी परतताना वाराणसी येथे बुधवारी दुपारी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
तेंव्हा त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तथापि दुर्दैवाने उपचाराचा फायदा न होता आज गुरुवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. वाराणसी येथून किरण यांचे पार्थिव गुरुवारी रात्री किंवा उद्या शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी दिल्लीहून विमानाने बेळगावला आणले जाणार आहे. अनेकांना मदतीचा हात देणारे किरण काळाच्या पडद्याआड झाल्याने मित्र परिवारात देखील शोक व्यक्त केला जात आहे दुसऱ्यांसाठी सामाजिक कार्यात हिराहिरीने भाग घेणाऱ्या अवलियाला टीम बेळगावला कडून श्रद्धांजली…