बेळगाव लाईव्ह : मराठी भाषेच्या संवर्धनासाठी तिचा व्यवहारातील वापर वाढवणे गरजेचे आहे. मराठी भाषा संत, समाजसुधारक, आणि वीर पुरुषांनी मोठी केलेली भाषा असून तिला अभिजात दर्जा मिळणे ही अभिमानाची बाब आहे.
आज मराठी भारतातील तिसऱ्या क्रमांकाची, तर जगभरातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे, हे तिच्या व्यापकतेचे द्योतक आहे, असे विचार पत्रकार शिवाजी शिंदे यांनी मांडले. बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.
मराठी भाषेच्या अभिजात दर्ज्याचा गौरव करत आणि तिच्या संवर्धनाची गरज अधोरेखित करत बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आले. अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे पत्रकार शिवाजी शिंदे यांचे स्वागत करण्यात आले.
उद्घाटनानंतर बोलताना पत्रकार शिवाजी शिंदे यांनी मराठी भाषेचे महत्व अधोरेखित केले.
ते पुढे म्हणाले की, मराठी भाषा ग्रंथातून जिवंत राहील, पण ती खरी भाषा म्हणून टिकणार नाही. ती आपल्याला आपल्या दैनंदिन व्यवहारात वापरावी लागेल. यासाठी प्रत्येक मराठी भाषिकाने आपल्या बोलण्यात आणि लेखनात तिचा अधिकाधिक वापर करावा. नवी दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तारा भवाळकर यांनी मांडलेल्या विचारांना अधोरेखित करत ते म्हणाले की, भाषा महत्त्वाची असून जात, धर्म गौण आहेत.
3 ऑक्टोबर रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे झाले आहे. त्यामुळे देशातील अभिजात भाषेचा सन्मान मराठी भाषेला मिळाला आहे खरंतर मराठी भाषा इतकी श्रीमंत, समृद्ध आहे की तिला अभिजात भाषेचा दर्जा दिला किंवा नाही दिला तरी तिचा मोठेपणा कमी होणार नाही मात्र आपल्या व्यवस्थेने एखादा भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी जे मापदंड निर्माण केले आहेत, हे मापदंड पूर्ण करून आज आपल्या मराठी भाषेने अभिजात भाषेचा दर्जा मिळविला आहे. हा मराठी भाषिकांसाठी आनंदाचा अभिमानाचा क्षण आहे.
कारण जी भाषा संतांनी, वीरांनी, समाज सुधारकांनी मोठी केली आहे तिला आज शासन मान्यता मिळाली आहे. आपल्या देशात जवळपास 22 मान्यता प्राप्त भाषा असून त्यापैकी दहा भाषांना आता अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त आहे. आपली मराठी भाषा ही भारतात बोलली जाणारी तिसऱ्या क्रमांकाची आणि जगभरातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. यावरून तिचा किती मोठा विस्तार आहे हे लक्षात येते असे शिंदे म्हणाले.
या कार्यक्रमाला पत्रकार विलास अध्यापक यांच्यासह बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सर्व सदस्य आणि पत्रकार उपस्थित होते.