बेळगाव लाईव्ह :ठप्प झालेली कर्नाटक -महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा अखेर पाच दिवसानंतर आज गुरुवारपासून पूर्ववत सुरू झाली आहे. त्यामुळे बस प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या समाधान व्यक्त होत आहे.
बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री खुर्द येथे गेल्या 21 फेब्रुवारी रोजी कर्नाटक परिवहन मंडळाच्या बस वाहकाला मारहाण झाली होती. त्याचप्रमाणे त्याच दिवशी रात्री चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या बस चालक व वाहकाला काळे फासण्यात आले होते. परिणामी तणावाचे वातावरण निर्माण होऊन गेल्या 22 फेब्रुवारीपासून महाराष्ट्र -कर्नाटक दोन्ही राज्यातील बेळगाव मार्गे होणारी परिवहन बससेवा पूर्णपणे ठप्प झाली होती.
क्षुल्लक कारणावरून दोन राज्यांमध्ये निर्माण झालेला वादाचा परिणाम दोन्ही राज्यातील परिवहन मंडळांवर झाला होता. विशेषतः बेळगाव विभागाचे दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत होते. याबरोबरच महाराष्ट्र परिवहनलाही मोठा फटका बसत होता. शिवाय आंतरराज्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे देखील मोठे हाल झाले. त्यांना मोठा आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत होता.
एकंदर परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत कोल्हापूर आणि बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बससेवा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केल्याने काल बुधवारी दुपारी कोल्हापूर, इंचलकरंजी, मिरज मार्गावरील बस सेवा सुरू करण्यात आली.
त्यानंतर दोन्ही राज्यातील निवळलेली परिस्थिती पाहून आज गुरुवारपासून कर्नाटक -महाराष्ट्र आंतरराज्य परिवहन बससेवा पूर्ववत सुरळीत सुरू करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्यात समाधान व्यक्त होत आहे.