बेळगाव लाईव्ह :-“खर्चीलेला पैसा, संपत्ती, ज्ञान पुन्हा मिळवता येते पण गेलेला वेळ कोणालाही परत आणता येत नाही. त्यासाठी छत्रपती शिवरायांचे वंशज असलेल्या मराठ्यांनी त्यांच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा .वेळेचे नियोजन करून आपल्या उद्योग व्यवसायात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सचोटीने व्यवसाय केल्यास अपयश कधी येणार नाही”असे विचार सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड यांनी बोलताना व्यक्त केले.
मराठा समाजातील तरुणांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या ” मित्रा फाउंडेशन” या नव्या फाउंडेशनचा प्रारंभ मंगळवारी सायंकाळी झालेल्या एका विशेष समारंभात झाला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अनंत लाड बोलत होते.
अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात अनंत लाड यांनी इतर समाजामध्ये असलेल्या चांगल्या गुणांचे अनेक उदाहरणे देऊन कौतुक केले आणि आपण मागे का पडत आहोत याचे चिंतन करण्याची गरज प्रतिपादन केली.
मंडोळी रोड वरील अयोध्या भवन येथे मंगळवारी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली.
श्री जयवंत साळुंके यांनी प्रास्ताविक केले व उद्देश गुरुनाथ किरमटे यांनी सांगितले. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन अनंत लाड व मराठा मंदिर चे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. मित्रा फाउंडेशनच्या लोगोचे अनावरण रामकृष्ण पाटील यांनी केल्यावर फाउंडेशनच्या फलकाचे अनावरण विनय मांगलेकर, दीपक गोजगेकर, विश्वजीत हसबे यांच्या हस्ते करण्यात आले.
मित्रा फाउंडेशनचे कुलदीप हंगीरगेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात मित्रा फाउंडेशनची उद्दिष्टे सांगितली. “मराठा समाजातील उद्योग व्यवसायिकांच्या मध्ये आलेली मरगळ दूर करून त्यांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून काम करण्यासाठी या फाउंडेशन ची सुरुवात करण्यात येत आहे.स्थानिक व्यावसायिकांना आपापसात व्यवहार करण्याबरोबरच ग्राहकांना उत्तम सेवा देऊन बाजारपेठ काबीज करणे, ऑनलाईन व्यापार कसा करावा त्यासाठी मार्गदर्शन व जाहिरातीसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार केला जाईल. वेळोवेळी मार्केटमधील बदला संबंधी मोटिव्हेशनल स्पीकर्स मार्गदर्शन करतील.

स्थानिक व्यावसायिकांची साखळी निर्माण करून व्यवसाय तसेच आर्थिक सुबत्तता आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. नजीकच्या काळात उद्योग व्यवसायाबरोबरच शिक्षण क्षेत्रातही हे फाउंडेशन पदार्पण करील” असे त्यांनी सांगितले.
फाउंडेशनचे विकास मांडेकर यांनी “शिवरायांनी घालून दिलेली शिस्त आम्ही या फाउंडेशन मध्ये ठेवली असून व्यावसायिकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्याबरोबरच शैक्षणिक दृष्ट्या मार्गदर्शन करणार आहे.”आपला समाज,आपला व्यवसाय” या फाउंडेशनच्या ब्रीदवाक्याने चालू झालेल्या संघटनेमधे शिवरायांच्या विचारांचे पालन केले जाईल “असे सांगितले.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या झुवारी ॲग्रो चे माजी उपाध्यक्ष आर वाय पाटील यांनी “मानवाचे जीवन हे आनंददायी, चांगले व अर्थपूर्ण अशा तीन प्रकारचे असते. त्यातील अर्थपूर्ण जीवन हे स्वतःबरोबरच समाजाचा विकासही घडवणारे असते. असे सांगून फाउंडेशन चे काम समाजापर्यंत पोहोचवा.तसेच स्थानिक व्यापाऱ्यांसाठी जाहिरात प्लॅटफॉर्म निर्माण करून देणे ही खूप चांगली सुरुवात आहे. मित्रा फाउंडेशन हा ब्रँड झाला पाहिजे आणि चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी समाज नेहमीच उभा राहतो” असे सांगितले.
” अति आत्मविश्वासामुळे आमचे लोक मागे पडत आहेत, त्यामुळे एकजुटीने कार्यरत राहून व्यावसायिक दृष्टिकोनातून सर्वांचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न करूया. शैक्षणिक दृष्ट्या जे काम करावयाचे आहे त्यात आम्ही कधी मागे राहणार नाही”अशी स्पष्टोक्ती निवृत्त मुख्याध्यापक विश्वजीत हसबे यांनी केली.
“सर्व समाजाच्या लोकांना विश्वासात घेऊन आपण पुढे गेलो तर कधीच मागे पडणार नाही. आज हे फाउंडेशन सुरू करताना जो उत्साह आहे तो कायम ठेवला तर संस्था मागे पडणार नाही” असे कर्नाटक स्टेट बार कौन्सिल चे उपाध्यक्ष आणि गोकाकचे वकील विनय मांगलेकर यांनी सांगितले.
“समाजासाठी आपले जे काही देणे आहे ते कार्य आम्ही करत राहू या असे सांगून सर्व मराठा बांधवांना पुढे घेऊन जाऊया” असे मत माई हॉस्पिटल च्या डॉ. उज्वल मिलिंद हलगेकर यांनी बोलताना व्यक्त केले.
“ज्यांच्या छत्राखाली आम्ही मोठे झालो त्या छत्रपती शिवरायांच्या जीवनातील गुणांचे अवलोकन करून एकमेकाला सहाय्य करून पुढे जाऊया”असे मत क्रेडाईचे माजी अध्यक्ष आणि प्रख्यात बांधकाम व्यवसायिक दीपक गोजगेकर यांनी बोलताना व्यक्त केले.
याप्रसंगी या फाउंडेशन द्वारा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लागणाऱ्या उपक्रमाचा खर्च उचलण्याची घोषणा मदन बामणे व आर एम चौगुले यांनी केली.
एका देणगीदाराने या फाउंडेशन साठी अडीच गुंठे ची जागा दान देत असल्याची घोषणा केली. याचबरोबर अनेक उपस्थितानी देणग्या जाहीर केल्या.कार्यक्रमास विविध स्तरातील उद्योजक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मारुती गुरव , रविंद्र थोरात, महेश पावशे, विशाल मुचंडी, ज्ञानेश्वर बेळगांवकर, सोमनाथ गोडसे,भाग्यश्री पवार,सागर मुतकेकर,मनोहर घाडी हे फाउंडेशनची सुरुवात केली. फाउंडेशनच्या पावती पुस्तकाचे अनावरण अनंत लाड यांनी केले तर मेंबरशिप फॉर्मचे अनावरण डॉक्टर उज्वल हलगेकर यांनी केले.आभार प्रदर्शन आनंद काटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौरांग गेंजी आणि अभिजीत पवार यांचं सहाय्य लाभलं.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ विनोदिनी आनंदाचे व सौ रोशनी हुंद्रे यांनी केले.


