बेळगाव लाईव्ह : जय किसान होलसेल भाजी मार्केटचा भूवापर परवाना रद्द करू नये, अशी विनंती जय किसान भाजी मार्केट व्यापारी संघटनेने आज मार्केटमधील सर्व व्यापाऱ्यांच्यावतीने महापौर मंगेश पवार आणि महापालिका आयुक्त शुभा बी. यांच्याकडे केली. “जी कागदपत्रे आवश्यक आहेत, ती आपण मागा; आम्ही ती देण्यास तयार आहोत. मात्र बेळगाव शहर विकास प्राधिकरणाने (बुडा) जो अन्याय केला, तो महापालिकेने करू नये,” असा ठाम आग्रह व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला.
बेळगाव शहरातील बहुचर्चित जय किसान होलसेल भाजी मार्केटच्या १० एकर २० गुंठे जागेचा भूवापर परवाना रद्द केल्याचा आदेश बुडा आयुक्त शकील अहमद यांनी नुकताच सोमवारी दिला. या पार्श्वभूमीवर या निर्णयाचा परिणाम भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांवर होण्याची शक्यता लक्षात घेऊन, आज शुक्रवारी व्यापारी संघटनेच्या नेतृत्वाखाली एक प्रतिनिधी मंडळ महापालिकेत दाखल झाले. महापौर आणि आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्यासमोर निवेदन सादर करण्यात आले.
या वेळी व्यापाऱ्यांच्यावतीने सांगण्यात आले की, “आपल्या निर्णयावर आम्हा दहा हजार लोकांचे भवितव्य अवलंबून आहे. आमचा कायदेशीर लढा सुरू आहे. तरीही जर आमच्यावर अन्याय झाला, तर आम्ही रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आम्हाला एवढीच विनंती आहे की, बुडाने जसा अन्याय केला तसा आपण करू नका. कायदेशीर प्रक्रिया काय असेल ती अवलंबा, आवश्यक ती कागदपत्रे मागवा; आम्ही ती देण्यासाठी तयार आहोत.”


व्यापाऱ्यांनी महापौर आणि आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलं की, “जरी एखाद्या लहानशा वादग्रस्त भूखंडाबाबतही तुमच्याकडून सुनावणी केली जाते, परस्पर विरोधी गटांना बोलावून निर्णय घेतले जातात, तरीही आमच्या ५०० कोटींच्या प्रकल्पाविषयी एकतर्फी निर्णय होतो, हे योग्य नाही. आम्हालाही आमची बाजू मांडण्याची संधी हवी आहे.”
भूवापर परवान्याबाबत न्यायालयीन निर्देशही असल्याचे व्यापाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. “आम्हाला इमारत परवाना मिळावा, भूवापर परवाना मिळावा यासाठी प्रांताधिकारी, न्यायालय आणि शासनाच्या विविध स्तरांवरून सकारात्मक निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार आम्ही २ कोटी ४३ लाख रुपयांचा विकास कर भरून इमारत उभी केली आहे. हे मार्केट केवळ व्यवसाय नाही, तर हजारो लोकांच्या उपजीविकेचा आधार आहे,” अशी माहिती यावेळी देण्यात आली.

“जय किसान भाजी मार्केट बेकायदेशीर असल्याचे काही विघ्नसंतोषी लोक सांगत आहेत, पण त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही,” असा प्रतिवादही व्यापाऱ्यांकडून करण्यात आला. “शेतकरी वर्गाचीही इच्छा आहे की, या मार्केटचा भूवापर परवाना रद्द होऊ नये. त्यामुळे महापालिकेने या सर्व बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा,” अशी स्पष्ट मागणी व्यापाऱ्यांनी यावेळी केली.
या वेळी जय किसान होलसेल भाजी मार्केटमधील बहुसंख्य व्यापारी उपस्थित होते.


