बेळगाव लाईव्ह : शारीरिकदृष्ट्या अपंग अर्थात दिव्यांग व्यक्तींना अधिक गतिशीलता आणि स्वातंत्र्य देऊन सक्षम करण्याच्या उद्देशाने बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आज त्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी कांही दिव्यांगांना विशेष डिझाईन केलेल्या दुचाकी वाहनांचे वितरण केले.
युवा नेते अमान सेठ, स्थानिक समर्थक आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत आमदार सेठ त्यांच्या हस्ते हा वाहन वितरण कार्यक्रम पार पडला. दिव्यांगांसाठी विशेष डिझाइन केलेली सदर दुचाकी वाहने दैनंदिन प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि लाभार्थ्यांसाठी सुलभ प्रवेशयोग्यता सुनिश्चित करणारी आहेत.
वाहन वितरणाप्रसंगी बोलताना आमदार सैत यांनी समाजातील सर्व घटकांसाठी प्रतिष्ठा आणि संधी सुनिश्चित करण्याची त्यांची वचनबद्धता स्पष्ट केली.

आपले हे प्रयत्न मतदारसंघातील समावेशक विकासाच्या मोठ्या दृष्टिकोनाचा एक भाग असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दिव्यांग दुचाकी लाभार्थ्यांनी आमदारांच्या पाठिंब्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. या उपक्रमामुळे आमचे जीवनमान सुधारण्यासह ते सुलभ होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी आमदारांच्या पाठीराख्यांसह हितचिंतक उपस्थित होते.


