बेळगाव लाईव्ह : आयएएस अधिकारी महांतेश बिळगी रस्ते अपघातात मृत्युमुखी पडल्याची बातमी ताजी असतानाच आणखी एक भीषण दुर्घटना धारवाडमध्ये घडली असून त्यामध्ये लोकायुक्त सीपीआय अर्थात पोलीस निरीक्षक पंचाक्षरी सालीमठ यांचा मृत्यू झाला आहे. ते प्रवास करत असलेल्या आय -20 कार गाडीने दुभाजकाला धडक देऊन पेट घेतला आणि पेटत्या कारमधून बाहेर पडत न आल्यामुळे सालीमठ यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला.
अन्नीगेरी तालुक्यातील भद्रापूर जवळील गदग -हुबळी राष्ट्रीय महामार्गावरील अरेरा पुलाजवळ काल शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजता उपरोक्त दुर्घटना घडली. गदग येथून हुबळीच्या दिशेने येत असताना नियंत्रण सुटलेल्या कार गाडीने रस्त्यावरील दुभाजकाला धडक देताच क्षणार्धात पेट घेतला.
त्यानंतर आगीने झपाट्याने कारला आपल्या विळख्यात घेतल्यामुळे ती संपूर्णपणे भस्मसात झाली. अपघात घडला त्यावेळी हावेरी येथे लोकायुक्त पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावणारे पंचाक्षरी सालीमठ हे स्वतः कार चालवत होते, अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. गदग येथील आपल्या कुटुंबीयांची भेट घेऊन परतत असताना दुर्दैवाने काळाने त्यांच्यावर घाला घातला.
अपघाताची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झालेले अग्निशमन दल आग विझवेपर्यंत कारगाडी संपूर्ण बेचीराख झाली होती. तसेच कार मधील मृतदेह होरपळून कोळसा झाल्यामुळे ओळखणे कठीण झाले होते. तथापि नंतर कुटुंबीयांनी मयताच्या हातातील ब्रेसलेट ओळखल्यामुळे मृतदेहाची ओळख पटू शकली.
कार गाडीने दुभाजकाला धडक दिल्यानंतर पेट्रोल टाकीला गळती लागून एखाद्या ठिणगीमुळे कार गाडीने पेट घेतला असावा असा पोलिसांचा कयास आहे. अपघात स्थळी धारवाडचे पोलीस अधीक्षक गुंजन आर्य यांनी भेट देऊन पाहणी केली.


