बेळगाव लाईव्ह : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढी पाडव्यासाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. हिंदू संस्कृतीनुसार नववर्ष म्हणून साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सणाच्या निमित्ताने होणाऱ्या खरेदीसाठी सर्वच बाजारपेठा हा मुहूर्त ‘कॅश’ करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
गुढीपाडव्यानिमित्त इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन खरेदी आणि सोने खरेदी याकडे ग्राहकांचा अधिक कल असतो. त्यामुळे अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानात विविध आकर्षक ऑफर्स सुरु आहेत. वाहनांच्या शोरूम्स मध्ये नव्या वाहनांचा ताफा दाखल झाला आहे तर सुवर्णपेढ्यांवरही जय्यत तयारी करण्यात आली आहे.
गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठेत लाखो – करोडो रुपयांची उलाढाल होते. मागील काळात कोविडमुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी कोलमडल्याने बाजारपेठेतील उलाढाल ठप्प होती. मात्र यंदा गेल्या दोन -तीन वर्षातील उणीव भरून काढण्यासाठी ग्राहकांसहित व्यापारीही सज्ज झाले आहेत. कित्येकांचे नव्या घरकुलाचे स्वप्नदेखील गुढीपाडव्याच्या निमित्ताने साकार होणार असून गुढीपूजनाच्या तयारीसाठी लागणारे साहित्यही बाजारपेठेत दाखल झाले आहे.
मिठाईच्या दुखणार साखरेच्या रंगीबेरंगी माळा दाखल झाल्या असून यासह चिव्याची काठी, फळे, फुले, कलश यासारखे साहित्यही दाखल झाले आहे. यंदा ‘मिनी गुढी’चा कन्सेप्टचीही बाजारपेठेत मोठी चलती असून घराच्या सजावटीसाठी मिनी गुढीला मोठी मागणी असल्याचे व्यापारी सांगत आहेत. नेहमीप्रमाणे बाजारपेठेतील पांगुळ गल्ली, मारुती गल्ली, गणपत गल्ली, मनासी गल्ली, खडेबाजार, कडोलकर गल्ली आदी ठिकाणी गुढीपाडव्याला लागणाऱ्या साहित्याची रेलचेल सुरु असून आकर्षक साहित्याने बाजारपेठ हाऊसफुल्ल झाली आहे.
गुढीसाठी लागणारी चिव्याची काठी म्हणजेच बांबूच्या काठ्यांची विक्री बुरुड गल्ली येथे मोठ्या प्रमाणात सुरु आहे. बुधवारी साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडव्याला सोमवारपासूनच नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली असून यंदा बाजारपेठेला उधाण येणार आहे.