केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नामुळे सुरू झालेल्या बेळगाव ते बेंगलोर सुपरफास्ट रेल्वे गाडीमुळे स्थानिक प्रवाशांची चांगली सोय झाली असली तरी अलिकडे ही रेल्वे बेंगलोर अथवा बेळगाव येथे उशीरा पोहोचत आहे. शिवाय धारवाडच्या लोकांच्या गर्दीमुळे बेळगावकरांना या रेल्वेची तिकिटेही मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत असून रेल्वेमंत्री अंगडी यांनी या प्रकरणी त्वरित लक्ष घालण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नामुळे सुरू झालेल्या बेळगाव ते बेंगलोर सुपरफास्ट रेल्वे गाडीमुळे स्थानिक प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. या रेल्वेमुळे अनेकांनी खाजगी अथवा परिवहन मंडळाच्या बसने बेंगलोरला जाणे बंद केले आहे. या रेल्वेचे वेळापत्रक ही दोन्ही बाजूने रात्री 9 वाजता प्रस्थान आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता आगमन असे सोयीचे होते. या रेल्वेचे डबे देखील नवेकोरे, स्वच्छ, खडखडाटाचा आवाज कमी असलेले, कमी हादरे बसणारे असे आरामदायी असल्यामुळे बेळगावहून बेंगलोरला जाण्यासाठी या सुपरफास्ट रेल्वेला प्रवाशांची मोठी पसंती आहे.
तथापि अलीकडे काही दिवसांपासून हुबळी आणि धारवाड येथील लोक या रेल्वेचा जास्त वापर करू लागले आहेत. त्यामुळे बेळगावच्या प्रवाशांना या रेल्वेचे तिकीट मिळणे कठीण झाले आहे. प्रारंभी ही सुपरफास्ट रेल्वे तिच्या अचूक वेळापत्रकासाठी प्रसिद्ध होती. तेंव्हा ती बरोबर रात्री 9 वाजता प्रस्थान करून दुसऱ्या दिवशी ठीक 7 वाजता पोहोचायची. परंतु आता गेल्या पंधरा दिवसांपासून ही रेल्वे बेंगलोरला सकाळी 7 ऐवजी चक्क एक-दीड तास उशीर पोहोचत आहे.
एखादी रेल्वे तीही सुपरफास्ट रेल्वे जर वेळेवर पोहोचत नसेल तर तिचा काय उपयोग? अशा प्रतिक्रिया सध्या उमटत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा खाजगी बस वाहतूकदार लॉबीचा कट आहे. कारण रेल्वे उशिरा पोचणार अथवा उशीरा निघणार असेल तर प्रवाशांना नाईलाजाने आपोआप बसचा आधार घ्यावा लागतो.
बेळगाव – बेंगलोर सुपरफास्ट रेल्वेला लोक “अगडींची रेल्वे” असे संबोधत असल्यामुळे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खासदार सुरेश अंगडी यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची बाब आहे. परंतु आता ही रेल्वे प्रचंड उशीर करत असल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे मंत्री सुरेश अंगडी यांनी याप्रकरणी त्वरित लक्ष घालावे अशी मागणीही केली जात आहे.